पाचोरा येथे बदलापूर घटनेच्या निषेर्धात मविआचे मूक आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बदलापूर येथे एका ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असुन या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षांनी २४ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ वाजता निषेध आंदोलन केले. विशेष म्हणजे आंदोलना प्रसंगी मुसळधार पावसाच्या सरी बरसत असतांना देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दोन्ही पक्षांनी तासभर आंदोलन केले. या निषेध आंदोलनात काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, संपर्क प्रमुख सुनिल पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, काँग्रेसचे जिल्हा सचिव इरफान मन्यार, अनिल सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे व उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बदलापूर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एका ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या शाळेतील कर्मचाऱ्याने अमानुष कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असुन या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. मात्र मा. न्यायालयाच्या आदेशानुसार सदरचा बंद मागे घेण्यात आला होता. पाचोरा काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांततेच्या मार्गाने तोंडावर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. विशेष म्हणजे निषेध व्यक्त करत असतांना मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र त्याची पर्वा न करता आंदोलकांनी भर पावसात आंदोलन यशस्वी करुन दाखविले.

Protected Content