भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खडका गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करत चाकूने वार करून जखमी करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील खडका येथे तेजबहाद्दुरसिंह सुरेंद्रसिंग पाटील हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तेजबहाद्दुरसिंह हा त्यांच्या घराच्या समोर बसलेला असतांन जुन्या भांडणाच्या कारणावरून तुषार वासुदेव भोळे, दर्शन दत्तात्रय भोळे, भुषण बेंडाळे, अनुराग नांदेळकर सर्व रा. खडका ता.भुसावळ यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यातील एकाने चाकूने त्यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी तेजबहाद्दुरसिंह याचे वडील सुरेंद्रसिंग पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तुषार वासुदेव भोळे, दर्शन दत्तात्रय भोळे, भुषण बेंडाळे, अनुराग नांदेळकर सर्व रा. खडका ता.भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्याम कुमार मोरे हे करीत आहे.