जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील रेशन धान्य दुकान नंबर 138 रेशन दुकानदार हा नेहमी कार्डधारकांना त्रास देत असून त्याचे रेशन धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जोगलखेडा येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी अजित पवार गट युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोड्या यांच्या नेतृत्वात तहसीलदार नानासाहेब आगळे यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.
जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील रेशन दुकान नंबर 138 हे जी. आर. पाटील हे चालवत असून गेल्या पंधरा महिन्यापासून गावातील रेशन कार्ड धारकांना अंत्योदय रेशन कार्ड वर 35 किलो धान्य नियमाप्रमाणे आहे. पण दुकानदार फक्त 20 किलो धान्य कार्डधारकांना देत असून ऑनलाइन नोंदणी करताना 35 किलो नोंद करीत आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतरही सदर रेशन दुकानदार ऐकत नसून कोणत्याही अधिकाऱ्याकडे माझी तक्रार करा, कोणी काही करू शकत नाही अशी धमकी रेशन कार्डधारकांना देत आहे.
सदर रेशन दुकानदारावर कायदेशीर कारवाई करून त्याचा रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितपवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, निलेश पाटील, राजू जोगी, एकनाथ जोगी, देविदास चव्हाण, संतोष पवार, सुधाकर जोगी, धनंजय पाटील, संतोष भोई, राजमल पाटील, ज्ञानेश्वर जोगी यांच्यासह जोगलखेडा येथील ग्रामस्थ नागरिक व महिला यावेळी उपस्थित होते.