Home राजकीय प्रथमच ! समलिंगी नेत्यांची शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती

प्रथमच ! समलिंगी नेत्यांची शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अनिश गावंडे या २७ वर्षीय समलैंगिकांच्या हक्कासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गावंडे यांची नियुक्ती हा भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण आहे. याचे कारण म्हणजे ते भारतातील राजकीय पक्षात इतके महत्त्वाचे पद भूषवणारे पहिले समलिंगी व्यक्ती ठरले आहेत. भारतातील समलिंगी, ट्रान्सजेंडर्स समूहाला आजही वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. हा समाज समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षाने उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

प्रभादेवी, मुंबई येथे वाढलेले, अनिश गावंडे यांना त्यांचे आजोबा, टी. के. टोपे यांच्या वारशाने प्रेरणा मिळाली. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. टोपे यांच्या प्रभावामुळे गावंडे यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांनी बौद्धिक इतिहास आणि सार्वजनिक धोरण या विषयात निष्णात आहेत.

अनिश गावंडे यांचा राजकारणातील प्रवास अनपेक्षित होता. सुरुवातीला राजकारण हा योग्य मार्ग आहे की नाही याची त्यांना खात्री नव्हती. सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि भारताला परतावा म्हणून काही देण्याच्या इच्छेने राजकारणातील प्रवेश करण्याचा निर्णय स्वीकारला. समलैंगिकांच्या अधिकारांचे वकील म्हणून त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. खास करुन पिंक लिस्ट इंडियाची स्थापना, समलैंगिकांच्या अधिकारांचे समर्थन करणाऱ्या राजकारण्यांचा डेटाबेस आणि यूथ फीड इंडिया द्वारे कोरोना मदत प्रयत्नांचे आयोजन यांसारख्या कार्यातून ते प्रकाश झोतात आले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली. परिणामी त्यांच्या कार्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.

राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून गावंडे यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ज्यामध्ये प्रसारमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे प्रतिनिधित्व करणे, पक्षासाठी जाहीरनामा आणि निवडणूक रणनीती तयार करणे, यांसह प्रमुख मुद्द्यांवर शीर्ष नेतृत्वाची मते सामायिक करणे यांसारख्या कामाचा समावेश आहे. गावंडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, त्यांचा हा प्रवास प्रवाहाबाहेरील अनेक तरुणांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरीत कलेल. त्यांचा निर्णय हेच दर्शवितो की, खुलेपणाने समलिंगी असणे आणि राजकारणात सहभागी होणे शक्य आहे.


Protected Content

Play sound