पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या अर्थसंकल्पात २८ जून रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या कल्याणासाठी असणारे आणि विरोधात असणा-यांमध्ये असेल अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर टाकत उपमुख्यमंत्री अजित पवार लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सुरुवातीला एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल, असे जाहीर केलेल्या सरकारने नंतर एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी घोषणा केली.
‘लाडकी बहीण’ योजनेची शाश्वती नसल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठा खुलासा केला आहे. ‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणे शक्य नसल्याचे विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणे हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसे त्यांनी स्पष्टदेखील केले आहे. कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणे अशक्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. ही निवडणूक महिलांच्या कल्याणासाठी असणारे आणि विरोधात असणा-यांमध्ये असेल. असे अजित पवार यांनी वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ भाऊबीज, राखी पौर्णिमेपुरती नसून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कायमची राबवली जाणार आहे. विरोधकांनी कितीही वावड्या उठवल्या, खोडे घातले तरीही भावाचा शब्द आहे, ही योजना महिलांसाठी पुढे कायम राहील. ही योजना बहिणींसाठी माहेरची मदत असल्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे.