माजी नगरसेवकाच्या मुलाची हत्या; पोलिस स्टेशनमध्ये मृतदेहासह नातेवाईकांचा ठिय्या आंदोलन

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जुन्या भांडणातून माजी नगरसेविकेच्या मुलाची शनिवारी रात्री हत्या करण्यात आल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. धारदार शस्त्राने वार करुन ही हत्या करण्यात आली आहे. शुभम देविदास पगारे असे या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. यामध्ये शुभमवर हल्ला करणारा तरुणही गंभीर जखमी आहे. मयत शुभम पगारे याचे काही दिवसांपूर्वी काही तरुणांसोबत वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून शुभम एका वाढदिवसातून परतत असताना पांडुरंग नगर भागात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला होता. त्याला नाशिकला उपाचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शुभम माजी नगरसेविका नूतन पगारे यांचा मुलगा होता. या घटनेने मनमाडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून मयत शुभम व हल्लेखोराच्या निवासस्थान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. घटनेची गांभीर्य ओळखून नाशिकचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन तसेच पोलीस निरीक्षक अशोक घुगे शहरात तळ ठोकून होते. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अधिकची कुमक मागवण्यात आली होती. दरम्यान शुभमच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी पोलीस स्थानकात धाव घेत मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान दुपारी शुभमच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणला होता. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहाचे अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

राजकीय नेत्याच्या दाबावामुळे खोटे गुन्हे दाखल करतात व खरे गुन्हेगार मोकाट राहतात. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता शुभमचा जीव वाचला असता, असा नातेवाईकांचा आरोप होता. मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी करत जवळपास अडीच तास नातेवाईकांनी मृतदेहासह भर पावसात ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी मारेकऱ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत सायंकाळी शुभमवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content