पहिल्या पावसातच नव्या संसद भवनाला गळती

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसामुळे नव्या संसद भवनाचे छत गळू लागले आहे. संसदेत काही ठिकाणी पाणी गळत असलेल्या ठिकाणी प्लॅस्टिकची भांडी ठेवण्यात असून याचा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ट्विट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीत गोंधळाचे वातावरण होते. शहराचा मोठा भाग पाण्याखाली गेला होता. नवीन संसद भवन संकुलातही पाणी साचले. पाऊस इतका झाला की छतावरून देखील पाणी गळू लागले होते. यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला असून नव्या संसदेची तुलना जुन्या संसदेशी करण्यात आली आहे.

ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्टकरत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लिहिले की, ‘या नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती, जिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते. त्यामुळे पुन्हा जुन्या संसदेत जाण्यास हरकत नाही. तो पर्यंत कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या संसदेत साठेलेले पाणी देखील वाहून जाईल. भाजप सरकारच्या काळात बांधलेल्या प्रत्येक इमारतीच्या छतावरून टपकणारे पाणी हा त्यांनी केलेल्या विकास कामाचा भाग आहे का ? असा खोचक टोला देखील त्यांनी हा व्हिडिओ शेअर करून लगावला आहे.

काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनीही यावर ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, “बाहेर पेपर लिक तर, आतमध्ये पाणी. राष्ट्रपतींद्वारे वापरण्यात येणाऱ्या नव्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळत असून यामुळे या कामाचा दर्जा सिद्ध झाला आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात या इमारतीतून पाणी गळू लागले आहे. या मुद्द्यावर लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला.

मुसळधार पावसामुळे गुरुवारी शहरातील सर्व शाळा बंद राहतील, अशी घोषणा दिल्लीचे शिक्षणमंत्री आतिशी यांनी केली. आज देखील दिल्लीत जोरदार पाऊस आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आज शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तर दिल्लीतील सब्जी मंडी भागात रॉबिन सिनेमाजवळ घर कोसळले, त्यात एक जण जखमी झाला. तर दुसऱ्या एका घटनेत दक्षिण-पश्चिम दिल्लीतील वसंत कुंज येथे भिंत कोसळून एक महिला जखमी झाली. खराब हवामानामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दिल्ली विमानतळावर उतरणारी किमान १० विमाने इतर विमानतळांवर वळवावी लागली. यापैकी ८ विमाने ही जयपूर आणि दोन लखनौ विमानतळावर उतरवण्यात आली. विमान कंपन्यांनी आणखी उड्डाणे विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली आहे.

Protected Content