भरधाव कारच्या धडकेत सहलीला गेलेल्या एका शिक्षिकेचा मृत्यू

बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर-मुरबाड रोडवर बारवी धरणाच्या पुलावर हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहलीला गेलेल्या एका महिला शिक्षिकेला कारने धडक दिली होती. यानंतर उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला होता. अखेर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शिक्षिकेच्या मृत्यूनंतर शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बदलापूर मुरबाड रोडवर बारवी धरणाच्या ओव्हरफ्लो पुलावर हा हिट अँड रनचा प्रकार घडला. अंबरनाथच्या पोतदार इंटरनॅशनल शाळेचे शिक्षक बारवी धरण परिसरात पावसाळी सहलीला आले होते. सुमारे १५ ते २० शिक्षकांचा ग्रुप सहलीचा आनंद घेत असताना एका भरधाव कारने सुनीता पिंटूकर या शिक्षिकेला धडक दिली. या घटनेत सुनीता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने बदलापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कार चालक तिथून पळून गेला. यासंदर्भात बदलापुर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारचालक सिद्धेश माळवे याला अटक करण्यात आली आहे.

Protected Content