भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस्वार शिक्षकाला चिरडले; दुसरा जखमी

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे भरधाव वेगातील मेटॉडोरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक देऊन चिरडल्याने एक शिक्षक जागीच ठार झाला, तर त्यांचा सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना आज घडली. खामगाव-पिंपळगाव राजा रोड वरील ऋषभ स्टाईल जवळ घडली.

खामगांव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर कार्यरत असलेले दोन शिक्षक आज सकाळी शाळेवर जाण्यासाठी (एमएच २८ एएच २०३४) या क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. दरम्यान उपरोक्त ठिकाणी, विरुध्द दिशेने येणाऱ्या (एमएच १७ टी ४६३८) क्रमांकाच्या भरधाव मेटॉडोरने त्यांच्या दुचाकीला समोरा समोर जबर धडक दिली. यात चिरडल्या गेल्याने इरफान शहा लुकमान शहा नामक शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी शिक्षक रफीउद्दीन शहाउद्दीन गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

जखमी शिक्षकाला खामगाव येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर मृतक इरफान यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला. या घटनेमुळे मृतकाच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच मृतकाचे नातेवाईक मोठ्या संख्येने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाले होते. या प्रकरणी वृत्त लीहेपर्यंत पोलीस कार्यवाही सुरू होती.

Protected Content