मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई येथील लालबाग परिसरातील शिरसागर हॉटेलसमोरील तीन मजली इमारतीला आज पहाटे आग लागली. गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत एकूण चार जण होरपळले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मुंबईतील लालबाग परिसरातील एसएस रोडवरील मेघवाडी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत एका महिलेसह दहा वर्षांची दोन मुले आणि एक व्यक्ती होरपळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली.
पीडित महिला आणि दोन मुले यांच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, दुसऱ्या व्यक्तीला भायखळा येथील मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे . अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आगीत दहा वर्षांची दोन मुले १५ ते २० टक्के होरपळले आहेत. तर, महिला ७० ते ९० टक्के आणि २७ वर्षांची व्यक्ती ६० ते ७० टक्के होरपळल्याची माहिती समोर आली.