Home Cities अमळनेर बोरी नदीवरील वळण बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता; मंत्री अनिल पाटील

बोरी नदीवरील वळण बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता; मंत्री अनिल पाटील


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, अंतर्गत अमळनेर तालुक्यातील फाफोरा येथील वळण बंधारा व त्याच्या डाव्या तीरावरील पूर पाटचारीच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास विशेष दुरुस्ती अंतर्गत १ कोटी ५२ लाख ९२ हजार ४१४ रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

याबाबतचा शासन निर्णय २३ जुलै रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर बोरी काठावरील गावामध्ये आनंदोत्सवात साजरा होऊन या कामासाठी विशेष पाठपुरावा करणाऱ्या मंत्री अनिल पाटलांचे आभार मानले. यावेळी मंत्री अनिल पाटील म्हणाले की, बोरी नदीवरील सदर ब्रिटिश कालीन बंधारा/ कालवा हा मागील ४० वर्षांपासून बंद असून सद्यस्थितीत याद्वारे सिंचन करता येत नाही. यामुळे सदर बंधारा दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होती. तसेच फाफोरा बंधाऱ्याच्या डाव्या तीरावरील वळण कालवा देखील सुमारे ४० वर्षांपासून बंद आहे. या वळण कालव्याद्वारे फाफोरा, अमळनेर शिवारातील शेतीस पूर्वी सिंचनाचा लाभ होत होता. सदर वळण कालवा दुरुस्ती करून त्याद्वारे बोरी नदीतील पाणी वळवुन त्याद्वारे अमळनेर परिसरातील धार मालपूर साठवण तलावात पाणीसाठा करणेसाठी त्या परिसरातील १२ गावाच्या सरपंच व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवदेनाद्वारे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे या ठिकाणी सदर वळण कालवा दुरुस्ती करून त्याद्वारे बोरी नदीतील पाणी वळवुन त्याद्वारे अमळनेर परिसरातील धार मालपूर साठवण तलावात पाणीसाठा करुन त्या परिसरातील १२ गावांना पाणी देण्याच्या दृष्टीने फाफोरा वळण बंधारा कालवा दुरुस्ती या कामास विशेष दुरुस्ती अंतर्गत म्हणून प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी मंत्री पाटील यांनी शासनाकडे केली होती,यासाठी सतत पाठपुरावा करत अखेर या कामाला प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याने शेतकऱ्यांना मोठी अनमोल भेट मिळाली आहे. यामुळे मंत्री पाटील यांचे कौतुक होत आहे.

सदर मंजुरी बद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित पवार, ग्रामविकास मंत्री ना गिरीश महाजन व जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.


Protected Content

Play sound