विदर्भात भाजपला मोठा धक्का; माजी खासदाराने दिला पक्षाचा राजीनामा

भंडारा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप पक्षाने शेतकऱ्यांची व बेरोजगार तरुणांची दखल घेतली नाही, यासाठीच राज्यात दयनीय अवस्था आहे शिवाय पक्षात कर्मठ कार्यकर्त्यांना किंमत नसून धनदांडग्यांची पक्षात हुजरेगिरी चालत असल्याचा घणाघाती आरोप करीत भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातील भाजप संपली असल्याचेही ते म्हणाले.

मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी २४ जुलैला आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे. यामुळे आधीच विवंचनेत असलेल्या भाजपला पूर्व विदर्भात जबर धक्का बसला आहे. शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. अत्यंत कमी वयात खासदार झालेले शिशुपाल पटले हे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात पोवार समाजाचा मोठा चेहरा मानले जातात. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा भाजपसाठी सुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

Protected Content