नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंगापूरचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. हेन्ली अँड पार्टनर्स या पासपोर्ट रँकिंग संस्थेने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारताला ८२ वे स्थान मिळाले आहे. या वर्षी जानेवारीत जाहीर झालेल्या निर्देशांकाच्या तुलनेत भारताच्या मानांकनात 3 स्थानांनी वाढ झाली आहे. भारतीय पासपोर्टवर 58 देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री आहे. याआधी जानेवारीत जाहीर झालेल्या निर्देशांकात भारताच्या मानांकनात 5 स्थानांनी घसरण झाली होती. 2023 मध्ये भारत 80 व्या स्थानावर होता.
सिंगापूरच्या पासपोर्टला या यादीत पहिले स्थान मिळाले आहे, ज्याला 195 देशांमध्ये व्हिसा मुक्त वैधता आहे. जपानसोबतच फ्रान्स, इटली, जर्मनी आणि स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ज्यांच्या पासपोर्टवर 192 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करता येतो. ऑस्ट्रिया, फिनलंड, आयर्लंड, लक्समबर्ग, नेदरलँड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे 191 देशांमध्ये मोफत व्हिसा प्रवेशासह तिसऱ्या स्थानावर आहेत. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीच्या आधारे ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
भारताच्या शेजारील देश पाकिस्तानचा पासपोर्ट हा जगातील चौथ्या क्रमांकाचा कमकुवत पासपोर्ट आहे. पाकिस्तानच्या पासपोर्टची क्रमवारी 100 आहे. येथील नागरिक 33 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतात. जवळपास दोन वर्षांपासून युद्ध सुरू असतानाही युक्रेनचा पासपोर्ट भारताच्याच नव्हे, तर रशियाच्या पासपोर्टपेक्षाही अधिक शक्तिशाली आहे. हेन्ली अँड पार्टनर्सच्या क्रमवारीत युक्रेनियन पासपोर्ट 30 व्या क्रमांकावर आहे. येथील नागरिक 148 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतात. तर रशियन पासपोर्टची रँकिंग 45 आहे. रशियन नागरिक व्हिसाशिवाय 116 देशांना भेट देऊ शकतात. 10 महिन्यांपासून हमासशी युद्ध सुरू असलेल्या इस्रायलच्या पासपोर्टची रँकिंग 18 आहे. अफगाणिस्तानचा पासपोर्ट 103 व्या क्रमांकासह जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे. अफगाण पासपोर्टवर व्हिसा फ्री प्रवास केवळ 26 देशांमध्ये करता येतो.