भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथील कंपनीमध्ये मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एकाची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी ४ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता ४ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील सरस्वती नगरात रवींद्र सोना अडकमोल वय-५५ हे वास्तव्याला आहे. १० डिसेंबर २०२२ रोजी त्यांची सुनील विश्वासराव पाटील वय-५५, रा. हुडको कॉलनी, नंदुरबार यांच्याशी ओळख निर्माण झाली. त्यांचा मुलगा आशिष याला नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी मध्ये लावून देण्याची आमिष सुनिल पाटील याने दिले. त्यावर विश्वास ठेवून रवींद्र अडकमोल यांनी १० डिसेंबर ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान सुनिल पाटील व त्यांचे सहकारी यांना वेळोवेळी नंदुरबार, भुसावळ आणि नाशिक येथे एकूण १० लाख रुपये दिले. दरम्यान अद्यापपर्यंत त्यांचा मुलगा आशिषला नाशिक येथील कोणत्याही कंपनीत नोकरी लागली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रवींद्र अडकमोल यांनी गुरुवारी ४ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार फसवणूक करणारे सुनील विश्वासराव पाटील (वय-५५ रा. हुडको कॉलनी नंदुरबार), मनीषा उर्फ हर्षदा प्रदीप पवार, जयेश राजेंद्र पाटील आणि प्रदीप यशवंत पवार सर्व (रा. निवृत्ती प्रभा आपार्टमेंट नाशिक) अशा चार जणांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे.