पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी काळात होवु घातलेल्या विधानसभेची पाचोरा मतदार संघाची जागा ही काँग्रेसला सुटणार असुन उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. पाचोरा व भडगाव तालुक्याचा आढावा घेतला असुन ईच्छुक उमेदवारांची नावे पक्ष श्रेष्ठींकडे पाठवणार असल्याची माहिती काँग्रेसचे पाचोरा मतदार संघासाठी नियुक्त असलेले आत्माराम जाधव यांनी २ जुलै रोजी पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, जिल्हा सरचिटणीस इरफान मणियार, प्रताप पाटील, जिल्हा सचिव राजु महाजन, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव संगिता नेवे, कुसुम पाटील, आजिम खान, सय्यद लाल भाई, श्रावण गायकवाड, रवि सुरवाडे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाचोरा मतदार संघाशी काँग्रेसची जुनी नाड असुन माजी मंत्री कै. के. एम. (बापु) पाटील यांनी त्यांच्या काळात पाचोरा तालुक्यात नविन धरणे, बंधारे, यांच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यास सुजलाम सुफलाम बनविले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारत व मतदारांनी राहुल गांधी यांचेवर विश्वास ठेवुन १३ खासदार लोकसभेवर पाठविले आहेत. याचाच अर्थ असा की, प्रत्येक मतदार संघात काँग्रेसची नांदी बघावयास मिळत असल्याने पक्षश्रेष्ठींनी जळगांव जिल्ह्यातील सर्व ११ मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार देण्याचे धोरण जाहीर केले असुन त्या – त्या मतदार संघात उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांच्या नैतृत्वाखाली पाचोऱ्यासह जिल्ह्यातील ११ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे आत्माराम जाधव यांनी सांगितले.
माझी लाडकी बहीण योजना ही फसवेगीरी…
राज्य सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे. मात्र या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना कागदपत्रे जमविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे तेलंगणा, कर्नाटक राज्यात काँग्रेसचे सरकार पात्र लाभार्थ्यांना ८ हजार ५०० रुपये देत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आमिष दाखवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे ही योजना दोन महिने सुद्धा चालणार नाही. असेही आत्माराम जाधव यांनी यावेळी सांगितले.