कोंडेश्वर धबधब्यात २२ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू

बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनुप मिश्रा असं या तरुणाचं नाव असून तो नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथून चार मित्रांसह कोंडेश्वरला फिरण्यासाठी आला होता.

कोंडेश्वरच्या महादेवाच्या मंदिरात दर्शन घेऊन निघताना त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि हे तरुण पाण्यात उतरले. मात्र यावेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनुप याचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. अनुप हा अतिशय गरीब कुटुंबातील असून तरुण मुलगा गमावल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, कोंडेश्वर धबधब्यात पोहण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही पर्यटक पाण्यात पोहोण्यासाठी जातात. येथे आतापर्यंत अनेक तरूणांनी आपला जीव गमावला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोंडेश्वरला जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात येते. मात्र अद्याप मुसळधार पावसाला सुरुवातही झालेली नाही, तोच दुर्घटना घडल्यामुळे कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Protected Content