पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पवना धरण परिसरात मित्रांसोबत फिरायला आलेल्या पुण्यातील एका महाविद्यालयीन तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. मावळमधील वन्यजीव रक्षक संस्था आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या संस्थेतील स्वयंसेवकांनी बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला. रात्री उशीरा त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
अद्वैत वर्मा असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये बीबीए अभ्यासक्रमाला होता. रविवारी (२३ जून) सुटी असल्याने अद्वैत आणि त्याचे सहा मित्र पवना धरण परिसरात फिरायला आले होते. दुपारी सर्वजण पवना धरणाच्या जलाशयामध्ये पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने अद्वैत बुडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निधीक्षक किशोर धुमाळ, पवनानगर पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी विजय पवार यांनी वन्यजीव रक्षक संस्था आणि शिवदुर्ग मित्र या संस्थेतील स्वयंसेवकांची मदत घेतली. अंधार पडल्यानंतर पथकाने शोधमोहीम सुरु ठेवली. रात्री अद्वैतचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.