वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील गौसिया नगरात धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या एकावर वरणगाव पोलिसांनी मंगळवारी ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई केली आहे. या प्रकरणी रात्री १० वाजता वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख कादिर शेख बशीर वय 56 रा. गौसिया नगर, वरणगाव असे संशयिताचे नाव आहे.
वरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरणगाव शहरातील गौसिया नगरात संशयित आरोपी शेख कादीर हा हातात धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी शेख कादिर शेख बशीर याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून धारदार शस्त्र हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे हे करीत आहे.