मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला सांभाळण्यात मोठं यश आलं आहे. मुंबईत 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. केवळ उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा विजय झाला आहे. उत्तर मुंबईची जागा वगळता मुंबईतील इतर सर्व जागा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडली आहेत.
खरंतर मुंबई आणि शिवसेना यांचे एक वेगळे समीकरण राहिलेलं आहे. पण शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईत यश मिळतं का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुंबईत शिवसेना पक्षफुटीनंतर लोकसभा निवडणूक ही मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरेंनी मुंबईत भाजप आणि शिंदे गटाला चारी मुंड्या चित केले आहे. मुंबईत एकूण सहा लोकसभेच्या जागा आहेत. या सहा पैकी 4 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार होते. या चारही जागांवर आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात उद्धव ठाकरे यांना मोठं यश आलं आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाकडून अरविंद सावंत हे उमेदवार होते. तर शिंदे गटाकडून यामिनी जाधव या उमेदवार होते. या ठिकाणी अरविंद सावंत हे घवघवीत मतांनी विजयी झाले आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून राहुल शेवाळे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे ते तिथले विद्यमान खासदार होते. तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई हे उमेदवार होते. या मतदारसंघात अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा पराभव केला आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रविंद्र वायकर उमेदवार होते. तर ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर उमेदवार होते. अमोल कीर्तिकर यांचा विजय झाला आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाची लढत ही अतिशय अटीतटीची ठरली. अखेर अंतिम क्षणी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांचा या मतदारसंघात विजय झाला. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव केला आहे. मुंबईतील केवळ एका जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे.