क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना योग्य सुविधा द्या : महापौर भारतीताई सोनवणें सूचना

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या चहा, नाश्ता, जेवणाची सोय योग्य ठेवावी. संपूर्ण परिसर दररोज निर्जंतुक करावा अशा सूचना महापौर भारतीताई सोनवणे यांनी केल्या. तसेच नागरिकांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःची खबरदारी योग्यप्रकारे घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

 

जळगाव शहरात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून क्वारंटाइन करण्यात येत आहे. क्वारंटाईन नागरिकांची व्यवस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आवारातील हॉस्टेलमध्ये व शाहू महाराज रुग्णालयात करण्यात आली असून त्याठिकाणी असलेल्या सोयसुविधांचा बुधवारी महापौर भारतीताई सोनवणे यांनी आढावा घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक ऍड.दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, अतुल बारी, रेडक्रॉस संस्थेच्या उज्ज्वला वर्मा, डॉ.राम रावलानी व इतर वैद्यकीय अधिकारी तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते.

 

रेडक्रॉसकडून चहापानची व्यवस्था

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना तसेच त्याठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दररोज चहापान रेडक्रॉस संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. सकाळी चहा, बिस्कीट, दूध, नाश्ता, दुपारी जेवण, चहा, सायंकाळी सरबत, जेवणाची सोय राखण्यात येत आहे. महापौर भारती सोनवणे यांनी खानपानच्या सर्व बाबींचा आढावा घेतला.

 

३५० क्वारंटाइन नागरिकांची व्यवस्था

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये ३५० नागरिकांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या १०० नागरिकांची व्यवस्था असून उर्वरित दोन हॉस्टेलची साफसफाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी बेड तयार आहेत. क्वारंटाईन नागरिकांसाठी व्यवस्था करण्यासाठी ३ फायर फायटरच्या मदतीने २०० फूट लांब पाईप वापरून ८० कर्मचाऱ्यांनी संपूर्ण इमारतीची साफसफाई केली.

 

साफसफाई कर्मचारी वाढवा, सॅनिटायझेशन करा

क्वारंटाईन नागरिकांची व्यवस्था असलेल्या ठिकाणी साफसफाईसाठी मनुष्यबळ कमी असल्याने महापौर भारतीताई सोनवणे यांनी तात्काळ कर्मचारी वाढविण्यासाठी आरोग्य निरीक्षकाला सूचना केल्या. तसेच त्याठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा उपयोग केला जात असल्याने सॅनिटायझेशनसाठी कायमस्वरूपी एक कर्मचारी नेमण्यात यावा. संपूर्ण इमारत दररोज निर्जंतुक करावी. सॅनिटायझेशन स्प्रे उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना महापौर सोनवणे यांनी दिल्या. शौचालयांचा उपयोग करताना नागरिकांनी शौचालयांच्या कडीवर अगोदर सॅनिटायझेशन स्प्रे करावा, त्यानंतरच त्याचा उपयोग करावा असेही महापौरांनी सांगितले.

 

गरोदर महिलांसाठी व्यवस्था करावी

शाहू महाराज रुग्णालयात महापौरांनी पाहणी करून मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता गर्भवती महिलांसाठी शहरातच रुग्णालयाची व्यवस्था असावी अशी बाब समोर आली. गर्भवती महिलांचे हाल होऊ नये त्यांना गावातच सुविधा मिळावी यासाठी आयएमएला विनंती करून शहरात निवडक ठिकाणी गरोदर महिलांसाठी उपचार व्यवस्था करावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले. तसेच त्या महिलांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका ठेवावी असेही त्यांनी सुचवले.

सफाई कर्मचाऱ्यांचे मानले आभार

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हॉस्टेलची पाहणी करताना मनपाचे सफाई कामगार त्याच ठिकाणी उपस्थित होते. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये ते सर्व कोरोना योद्धा म्हणून महत्वाची भुमिका बजावत आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल महापौर भारतीताई सोनवणे व स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा यांनी कामगारांचे आभार मानले.

नमस्कार, मी महापौर भारती सोनवणे बोलतेय…

जळगाव शहराच्या विविध परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात येत आहे. रुग्णालयात नागरिकांना जेवणाची सुविधा योग्य आहे का? स्वच्छता राखण्यात येते का? यासाठी बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी आपल्या कार्यालयातून क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांना फोन करून माहिती जाणून घेतली. काहीही असुविधा असल्यास संपर्क करण्याचे आणि रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर घरी क्वारंटाइन राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

Protected Content