राज्यात महायुती व महाविकास आघाडीत ‘टशन’ : अनेक ठिकाणी जोरदार लढती

मुंबई-वृत्तसेवा | राज्यातील सत्ताधारी महायुती व विरोधातील महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात जोरदार लढत होणार असल्याचे संकेत हे प्राथमिक कलांनुसार दिसून आले आहे.

महायुतीने गेल्या म्हणजे २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन केले होते. तेव्हा महायुतीला तब्बल ४३ जागा मिळाल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षात राजकीय स्थिती मोठ्या प्रमाणात बदलली असून महायुतीमध्ये शिंदे गट व अजित पवार यांचा गट सहभागी झाला असून उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षाची शकले उडून नवीन नावाने ते कॉंग्रेसच्या सोबतीने मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी महायुतीकडून किमान ४५ जागांवर विजय मिळण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र जशीजशी निवडणुकीची प्रक्रिया पुढे सरकली तसा हा कल बदलत गेला.

आधी महायुतीसाठी सोपी वाटणारी निवडणूक ही शेवटच्या टप्प्यापर्यंत अत्यंत चुरशीची झाली. यामुळे काही अपवाद वगळता बहुतांश एक्झीट पोल्सच्या निष्कर्षांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार टक्कर होऊन दोन्ही बाजूंना जवळपास समान वा एखाद-दुसरी जागा इकडे तिकडे होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजेपासून राज्यभरातील ४८ लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला आहे. याचे प्रारंभीचे कल पाहता महायुतीचे उमेदवार 22 तर महाविकास आघाडीचे उमेदवार 25 जागांवर आघाडी आघाडीवर असल्याचे कल समोर आले आहे. तर सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आघाडी मिळाली आहे. यात नेमकी बाजी कोण मारणार हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

 

Protected Content