मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पाणीकपातीमुळे आंघोळीला फाटा देण्याचा सल्ला देणाऱ्या एका महिलेवर तिच्या पतीने संतापाच्या प्राणघातक हल्ला केल्याची घटना मुंबईच्या साकीनाका भागातील टिळक नगरात घडली आहे. मीरा गुप्ता असे जखमी महिलेचे नाव आहे. तर परमात्मा गुप्ता असे तिच्या आरोपी पतीचे नाव आहे. मुंबईत सध्या 5 टक्के पाणी कपात सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांना पाणी जपून वापरावे लागत आहे. हाच पाणी जपून वापरण्याचा सल्ला एका महिलेच्या जीवावर बेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार, परमात्मा गुप्ता शनिवारी उन्हातून घरी आले होते. त्यानंतर ते आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेले. पण पत्नीने त्यांना आंघोळ करण्यास मनाई केली. बीएमसीची पाणीकपात सुरू असल्यामुळे आपण पाणी वाचवले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. यावरून दोघांत बाचाबाची झाली. त्यानंतर परमात्मा यांनी संतापाच्या भरात चाकूने मीरा यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.