सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एका वयोवृद्ध शिक्षकाशी असलेल्या ओळखीतून विद्यार्थ्याने आर्थिक गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक परताव्याची भुरळ पाडून त्या वयोवृद्ध सेवानिवृत्त शिक्षकाची १२ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. याबाबत सलीम शमशोद्दीन वळसंगकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचाच विद्यार्थी असलेला सोहेल हजरतखान पटेल याचे नाव आरोपी म्हणून निष्पन्न झाले आहे. तो गायब झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
सलीम वळसंगकर हे पूर्वी पंढरपूर नगरपरिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवेत असताना त्याच शाळेत सोहेल पटेल हा विद्यार्थी म्हणून वळसंगकर यांच्याकडून अध्यापनाचे धडे घेत होता. तेव्हापासून त्याची वळसंगरकर यांच्याशी ओळख होती. दरम्यान, २१ ऑगस्ट २०२३ रोजी त्याने सोलापुरात वळसंगकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. आपण ॲमझॉन इंटरनॅशनल कंपनी आणि भारत पे नॅशनल कंपनीमध्ये गुंतवणूकदार म्हणून काम करीत असल्याचे सांगत कंपनीने दिलेले स्वतःचे ओळखपत्र दाखवून गुरूजींना गुंतवणुकीची योजना सांगितली.
अडीच लाखांची रक्कम कंपनीत गुंतवल्यास एका वर्षात तीन लाख ६५ हजारांची रक्कम बँक खात्यावर जमा होईल, असे म्हणून विश्वास संपादन करत सोहेल पटेल याने वळसंगकर गुरूजींना गुंतवणूक करण्यास राजी केले. वेळोवेळी मिळून वळसंगकर यांनी १२ लाख ५० हजार रूपयांची रक्कम गुंतवली. परंतु वर्ष उलटून गेले तरी परतावा मिळत नसल्यामुळे अडचणीत आलेल्या वृध्द वळसंगकर यांनी सोहेल पटेल याच्या पाठीमागे लकडा लावला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि शेवटी त्याने, मला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. तुम्ही मला पैसे परत मागितले तर मी तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.