नागपुरात वकिलानेच केली आपल्या पक्षकाराची हत्या

नागपुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | न्यायालयात ज्याची बाजू मांडायची त्याचीच वकिलाने हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. नोकरीतून निलंबित केल्यानंतर कारवाई विरोधात बाजू मांडण्यासाठी एका व्यक्तीने वकिलाची नियुक्ती केली. मात्र त्या वकिलानेच पक्षकाराचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हत्याकांडामध्ये वकिलासह त्याच्या मुलाचाही हात असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री वकिलाने पक्षकाराचा खून केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी वकील आणि मुलाला अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे अश्विन मधुकर वासनिक आणि अविष्कार अश्विन वासनिक अशी आहेत. तर हरीश कराडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हरीश कराडे यांना हवाई दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या वतीने न्यायालायत अश्विन वासनिक यांनी बाजू मांडली. त्यांचा निलंबनाचा आदेश रद्द करून पुन्हा नोकरीत घेण्यात आले.

दरम्यान, कराडे आणि वासनिक यांच्यात पैशावरून वाद झाला. रविवारी रात्री कराडे हे वासनिक यांच्या घरी गेले होते. दोघेही एकत्र दारू प्यायले आणि त्यांच्यात पैशावरून जोरात वादावादी झाली. तेव्हा वासनिक आणि त्यांचा मुलगा अविष्कारने कराडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या प्रकरणी कराडे यांची पत्नी सोनाली यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक केली आहे.

Protected Content