भरधाव टँकरच्या धडकेत तरुण मुलगा ठार, आई गंभीर जखमी; नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे बसस्थानकाच्या परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये १९ वर्षीय तरुण ठार झाला असून त्याची आई जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अविनाश रवींद्र पाटील (वय १९, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात अविनाश पाटील हा तरुण आपल्या आई वडील यांच्या सहवास्तव्याला होता. तो फोटोशॉपीच्या दुकानात काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शुक्रवारी १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता अविनाश त्याच्या आईला घेऊन जळगावकडे जाण्यासाठी निघाला असता कुसुंबाच्या बसस्थानकाजवळ भरधाव येणाऱ्या टँकरने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या धडकेत अविनाश पाटील गंभीर जखमी झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अविनाश पाटील याला नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. अविनाश पाटील यांच्या आईला देखील मार लागला असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील कर्ता पुरुष आणि एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले

शनिवारी १८ मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

Protected Content