रावेर (प्रतिनिधी) अज्ञात चोरट्याने शहरातील दोन मेडिकल फोडून तब्बल १६ हजार ४०० रुपयांची रोकड लांबवल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या संदर्भात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, रावेर शहरातील माऊली हॉस्पिटलच्या खाली असलेले मुक्ताई मेडिकल दोन दिवसा पासून डॉक्टर बाहेरगावी असल्याने औषध विक्रीची रोकड १५ हजार 400 रुपये मेडिकल चालकाने ड्रॉपमध्ये ठेवली होती. कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने बुधवारी मध्यरात्री शटरचे कुलूप तोडून मेडिकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले १५ हजार ४०० रुपये लंपास केले. मेडिकल चालक विजय मनोहर पाटील हे सकाळी नेहमी प्रमाणे दुकानावर आल्यावर हा सर्व प्रकार लक्षात आला. यानंतर लगेच त्यांनी, रावेर पोलिसात फिर्याद देऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या मेडिकलमधून लांबवले हजार रुपये
मुक्ताई मेडिकलमध्ये हात सफा केल्यानंतर चोरट्याने काही अंतरावरच असलेल्या साईश्रद्धा मेडिकलकडे आपला मोर्चा वळविला. या मेडिकलचे देखील शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व गल्ल्यात ठेवलेले १ हजार रुपये लंपास केले. दरम्यान, या चोऱ्यांंमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.