पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पिंपरी चिंचवडमधील रावेतमधून ८ उंट कर्नाटककडे जात असताना गोकर्ण येथे पकडून पोलिसांनी दोन जणांची अटक करून उंटाची सुटका केली आहे. अरुण कुमार चिनाप्पा आणि लखन मगन जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, चिनाप्पा हा ट्रकचालक असून लखन हा ऊंट सवारीचे काम करतो. तक्रारदार सातपुते हे पुण्यातील वारजे परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना मानद पशू कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दूरध्वनी करुन एका वाहनाबद्दल माहिती दिली. रावेतवरुन एक ट्रक निघाला असून त्यामध्ये काही ऊंट दाटीवाटीने पाय बांधून निर्दयतेने भरण्यात आले आहेत, अशी माहिती स्वामी यांनी दिली. सातपुते आणि त्यांचे मित्र प्रसाद मारुती दुडे, अशितोष सुरेश मारणे, अजय बसवराज भंडारी, सागर गोविंद धिडे हे मुंबई-बेगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात थांबले होते.
सदर चांदणी चौकाकडून येणारा संशयित ट्रक त्यांनी पाहिला. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला आणि पुलाजवळ ट्रक थांबविण्यात आला. ट्रक चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीची चौकशी केली. त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये आठ ऊंट एकत्रित बांधून ठेवण्यात आल्याचे दिसले. या ट्रकला चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आलेले होते. उंटांचे पाय आणि तोंड निर्दयतेने बांधण्यात आलेले होते. ट्रकमध्ये चारापाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक आणि उंट ताब्यात घेतले व दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सदर आठ उंटांना पांजरपोळ येथे ठेवण्यात आले आहे.