पालघर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ते शिंदेच्या शिवसेनेतून भाजपमध्ये सामील झाले. पालघर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपने हेमंत सावरा यांना दिल्यामुळे ते नाराज होते. ही जागा शिवसेनेला न मिळता भाजपला मिळाली होती. मात्र त्यांनी आता शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. राजेंद्र गावित दिल्लीपेक्षा महाराष्ट्रामध्ये चांगले काम करू शकतात. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच राहावे, अशी आम्ही विनंती केली होती. त्यानुसार राजेंद्र गावित आता महाराष्ट्रात चांगले काम करतील, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राजेंद्र गावित हे महाराष्ट्रातील मोठे आदिवासी नेते मानले जातात. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस-भाजप-शिवसेना असा राहिलेला आहे. ते काँग्रेसमध्ये असताना आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री होते. २०१९ मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर पालघरचे खासदार झाले होते. ते मूळचे नंदूरबारचे आहे. शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच राहण्याचे ठरवले होते. मात्र आता उमेदवारी न मिळाल्यामुळे परत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.