नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्षाविरोधात जाता बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी माझ्या सोबत भगूर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिकमधील 27 ते 30 नगरसेवक तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य असल्याचा दावा करत त्यांनी ठाकरे गटाला इशारा दिला होता. मात्र विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
पक्षात प्रवेश करताच त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख पद देण्यात आले आहे. विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे नाशिकचे महायुतीकडून असलेले उमेदवार हेमंत गोडसे यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. करंजकरांच्या प्रवेशामागे बारगेनिंग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरनी केला आहे. तर करंजकर पक्षातून गेल्याचा आनंद झाला आहे. आम्हाला त्यांचा त्रासच होत होता, असे ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी म्हटले आहे. विजय करंजकर पक्षातून गेल्याने कुठलाही फटका बसणार नाही. आमचा विजय निश्चित आहे, असा दावा नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी केला आहे.