जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रीराम मंदीर चौक मेहरूण येथे राहणाऱ्या प्रौढ व्यक्तीने मेहरूण तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. विलास बाळकृष्ण वाणी (वय वर्ष ४९, रा. श्रीराम मंदिर चौक, मेहरुण) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विलास वाणी हे आपल्या पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, मोठा भाऊ यांच्यासह मेहरूण येथील श्रीराम चौकात वास्तव्याला होते. एमआयडीसी येथील बँजो केमिकल कंपनीत कामगार म्हणून काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी २४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता बाहेर जात असल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. दरम्यान त्यांनी मेहरूण तलावात उडी घेवून आत्महत्या केली.
हा प्रकार गुरुवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांनी मेहरूण तलाव त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आल्याने उघडकीला आले आहे. याबाबतची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. विलास वाणी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषित केले.
कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मृत्युची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात देवेंद्र आणि ओम ही दोन मुले, पत्नी कोमल आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.