जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील ईसेक्टरमधील गुरूकृपा इंडस्ट्रिज कंपनीचे लोखंडी दरवाजा तोडून आतून ६४ हजार २४२ रूपये किंमतीच्या इलेक्ट्रीक मोटारी चोरून नेल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोकेश प्रकाश पाटील वय ३८ रा. जीवन नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे एमआयडीसीतील ई सेक्टरमध्ये गुरूकृपा इंडस्ट्रीज नावाची कंपनी असून चेरी बनविण्याचे काम केले जाते. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते बुधवार १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांची कंपनी बंद असतांना अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या मुख्यदरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कंपनीतून ६४ हजार २४२ रूपये किंमतीच्या ईलेक्ट्रीक मोटारींची चोरी केल्याचे समोर आले. कंपनीत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे हे करीत आहे.