जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीद्वारे विविध ठिकाणी नि:शुल्क योग शिबिरांचे आयोजन गेल्या दोन महिन्यापासून करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत सोहम डिपार्टमेंटमध्ये चालविण्यात येणाऱ्या योगशिक्षक पदविका अभ्याक्रमाचा एक भाग म्हणून योग प्रशिक्षकांच्या माध्यमातून या सात दिवसीय नि:शुल्क योग शिबिरांचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले होते.
या शिबिरांचे आयोजन सर्वसामान्य लोकांसाठी, महिलांसाठी, विद्यार्थ्यांकरिता, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांकरिता करण्यात आले. योगशास्त्राचा प्रचार प्रसार व्हावा, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योगसाधनेची ही गंगा पोहचवून, लोकांना आपल्या स्वास्थाप्रती जागृत करण्याच्या आणि त्याना संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले. प्राध्यापकांनी योगविषयक मार्गदर्शन करून योग साधनेचे दैनंदिन जीवनातील महत्व पटवून दिले. या सर्व शिबिरांचे आयोजन करण्यासाठी सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार, प्रा. ज्योती वाघ, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. स्मिता पिले, प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.