वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात वरणगावसह परिसरातील दोनशे पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपने रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने पहिल्या दिवसापासून तीव्र पडसाद उमटले आहेत. पहिल्यांदा यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमधील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी याला विरोध केला. लागलीच भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरातही हे लोण पोहचले. यानंतर आता वरणगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते बूथ प्रमुख व सुपर वारियार मिळून २०० जणांनी रविवारी आपल्या पदाचे राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्हाध्यक्ष आमोल जावळे यांच्याकडे पाठविले आहेत.
रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी नकोच अशी भूमिका घेत वरणगाव भागातील भाजपच्या २०० पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे सामूहिक राजीनामा दिला आहे. खासदार रक्षा खडसे या भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्त मदत करतात. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडून भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर देखील खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. त्यावेळी रक्षा खडसे यांनी एकदाही राष्ट्रवादीला विरोध केला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सामूहिक राजीनामा देणार्या भाजपच्या पदाधिकार्यांनी केली.
लक्षणीय बाब म्हणजे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासोबत, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश निमकर, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष माला मेढे, शामराव धनगर, महिला शहर अध्यक्ष प्रणिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस डॉ . सादिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हजी फायुम, तालुका अध्यक्ष साबीर कुरेशी तालुका सरचिटणीस रमेश पालवे, नाना चुधरी, हितेश चौधरी, सुशीलकुमार झोपे, शेतकी संघ संचालक सुशील झोपे विविध कार्यकारी संचालक अनिल वंजारी, गुड्डू बढे, कायदे आघाडी सरचिटणीस ऍड. ए.जी. जंजाळे यांच्यासह २०० जणांचा समावेश असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांनी दिली आहे.