पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा समावेश करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवश्यक बदल करणार आहे. याबाबत विद्यापीठाच्या वतीने कार्यवाही सुरू असल्याने पीएच.डी. प्रवेश पूर्वपरीक्षेसाठी (पेट) उमेदवारांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याऐवजी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट परीक्षा होण्याची शक्यता आहे. पीएच.डी. प्रवेशासाठी असलेली स्पर्धा पाहता मराठा आरक्षणाची अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे अधिकारी सांगतात. राज्य शासनाने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच त्यासंदर्भातील अध्यादेशही प्रसिद्ध केला.
२६ फेब्रुवारीपासून या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी केंद्रनिहाय आरक्षण देण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचे परिपत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाईल. विद्यापीठाच्या अंतर्गत पीएच.डी. करता यावी म्हणून पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी उत्सुक असतात. पीएच.डी.च्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेप्रमाणेच (नेट) राज्यस्तरीय पात्रता परीक्षेलाही (सेट) मान्यता आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षांमध्ये आवश्यक गुण प्राप्त न झालेले विद्यार्थी ‘पेट’च्या माध्यमातून प्रवेशाला पसंती देतात. राज्य शासनाने सकल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेमध्ये याची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. त्यादृष्टीने आवश्यक बदल करण्यात येत असून, नियोजित वेळेपेक्षा फार तर आठवडाभर उशिराने ‘पेट’ परीक्षा पार पडेल.