धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील २६ वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाचा झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार समोर आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषण ईश्वर पाटील (वय-३५, रा. बाभुळगाव ता.धरणगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बाभूळगाव येथे भूषण पाटील हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी दुपारी त्याने बाभूळगाव शिवारातील त्यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता मयताचा भाऊ विकास पाटील हा शेतात आला असता त्याला हा प्रकार लक्षात आला. त्याने शेतातील काही नागरिकांना बोलवून खाली उतरून तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील हे करीत आहे.