भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील इमली पुरा परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीचा विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. या प्रकरणी सायंकाळी ५ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रवीओम सुगनचंद शर्मा (वय-५५) रा. इमली पुरा भुसावळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवी ओम शर्मा हे आपल्या परिवारासह भुसावळ शहरातील इमलीपुरा परिसरात वास्तव्याला होते. ७ फेब्रुवारी रोजी त्यांनी घरी असताना काहीतरी विषारी औषध घेतले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना भुसावळ शहरातील रिदम हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. विषारी औषध घेतल्याचे कारण समजू शकले नाही, दरम्यान या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत तायडे हे करीत आहे.