दहा लाखात तलाठी व्हा! विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लाठी पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर गंभीर आरोप करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावरूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. “थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा आणि दहा लाखात तलाठी व्हा अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे. या सर्व घटना समोर आल्यावर देखील सरकार गंभीर नसल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत ट्वीट करत वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील 19 हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान 9 आरोपी समान आहेत आणि त्यांची मोडस ऑपरेंटी सारखीच आहे. दहा लाखात तलाठी व्हा! थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा! अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे. परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी 3 लाख रूपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत. तरीही सरकार गंभीर नाही, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.
तर, राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी, तसेच सर्व परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात याव्यात अशी मागणी करणारे पत्र वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे. पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Protected Content