मुक्ताईनगर-पंकज कपले (एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट ) | आज शहरातून निघालेल्या भव्य अक्षता कलश यात्रेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी दर्शनासाठी दिलेली उपस्थिती ही चर्चेला निमंत्रण देणारी ठरली आहे. एकीकडे मविआतील कोणत्याही मोठ्या नेत्याने अक्षता कलश यात्रेत हजेरी लावली नसतांना नाथाभाऊंनी थेट आपल्या तत्कालीन सहकार्यांसोबत आठवणींना उजाळा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राजकारणात आमदार एकनाथराव खडसे हे तूर्तास तरी एकाकी पडल्याचे चित्र आहे. पक्षांतर केल्यानंतर आमदारकी मिळाली तरी लागलीच महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने मंत्रीपदाने हुलकावणी दिली. यानंतर अजितदादा पवार गटाने सरकारमध्ये सहभागी झाल्यावर देखील त्यांची मंत्रीपदाची संधी पुन्हा हुकली. ते सातत्याने स्थानिक ते राज्य पातळीवर सत्ताधार्यांशी लढत असले तरी याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भोसरीचे भूत सतावत असतांना गौणखनिज उत्खननात खडसे कुटुंबाला मोठा दंड झाल्याने ही अस्वस्थता वाढीस लागलेली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, मुक्ताईनगरात एक घटना घडली.
आगामी २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे उदघाटन होत असून याच्या आधी देशातील प्रत्येक गाव व शहरातून अक्षता कलश यात्रा काढण्यात येत आहेत. मुक्ताईनगरातून देखील आज भव्य कलश यात्रा काढण्यात आली. यात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आदी संघ परिवारातील संघटनांचे सदस्य आणि हिंदुत्ववादी मंडळीचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील यात सहभागी झाले. याच कलश यात्रेत आ. एकनाथराव खडसे यांनी कलशाचे दर्शन घेतले.
नाथाभाऊ हे कारसेवक म्हणून राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांना उत्तरप्रदेशातील ललीतपूर येथील कारागृहात दाखल करण्यात आले होते. आज श्रीराम अक्षता कलशाचे दर्शन घेतांना त्यांनी या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी आ. एकनाथराव खडसे यांनी डोक्यावर घातलेली भगवी गांधी टोपी देखील उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
प्रत्येक गाव आणि शहरात अक्षता कलश यात्रा सुरू असतांना विरोधातील व विशेष करून महाविकास आघाडीतील कुणा नेत्याने यात सहभागी होऊन कलशाचे दर्शन घेतल्याचे ऐकीवात नाही. या पार्श्वभूमिवर, खडसे यांनी थेट भगवी टोपी डोक्यावर घालून कलशाचे दर्शन घेतल्याची छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे.
नाथाभाऊ यांनी राज जन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतला होता, ते राजकीय कारकिर्दीत प्रखर हिंदुत्ववादी होते, प्रभू श्रीराम हे सर्वांचे असल्याने कलश यात्रेत दर्शन हे वावगे नाहीच ! मात्र या सर्व बाबी गृहीत धरल्या तरी मविआतील अन्य नेत्यांनी असे केले नसतांना नाथाभाऊंनी करणे म्हणजे त्यांच्या मनात चाललेय तरी काय ? या प्रश्नाला नक्कीच फोडणी देणारे ठरले आहे.