नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील रामलल्लाच्या चरणी नाशिकच्या गुलाबाचा हार अर्पण होणार आहे. फूल विक्रेते भूषण कमोद यांनी सुमारे पाच फुटी गुलाबाचा हार तयार केला आहे. रामलल्लाच्या गळ्यात शहरातून गेलेला हार अर्पण होणार आहे.अयोध्येतील रामलल्लाच्या चरणी नाशिकच्या गुलाबाचा हार अर्पण होणार आहे. फूल विक्रेते भूषण कमोद यांनी सुमारे पाच फुटी गुलाबाचा हार तयार केला आहे. रामलल्लाच्या गळ्यात शहरातून गेलेला हार अर्पण होणार आहे.
माझ्यासह नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया विक्रेत्यांकडून देण्यात आली. प्रभू श्रीरामाच्या चरण स्पर्श झालेली धार्मिक संस्कृतीचा ठेवा आणि गुलाबांच्या फुलांचे शहर अशी शहराची ओळख आहे. अशा फुलांच्या शहरात उमललेल्या विविध रंगी गुलाबाच्या फुलांचा हार देशच नव्हे तर जगभरातील भारतीय बांधवांच्या श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील रामलाल्याच्या गळ्यात अर्पण होणार आहे.
जुने नाशिक तिवंधा येथील रहिवासी एकनाथ सातपूरकर यांच्या माध्यमातून बुधवारी (ता. ३) सकाळी फुलांच्या हाराचा प्रवास सुरू झाला आहे. गुरुवारी (ता. ४) सकाळी सुमारे दहा ते अकराच्या सुमारास हार अयोध्येत रामलल्लाच्या चरणी दाखल होणार आहे. सध्या रामलल्लाच्या ज्या मूर्तीचे दर्शन भाविकांकडून घेतले जात आहे. त्या ऐतिहासिक मूर्तीस हार अर्पण होणार आहे, अशी माहिती मंगेश मुसमाडे यांनी दिली. अयोध्येतील राममंदिरासह परिसरात शहरातील गुलाबाचा सुगंध दरवळणार आहे.
फूल विक्रेता हार तयार करत असताना परिसरातील नागरिकांना तयार करण्यात येत असलेला हार अयोध्येत जाणार असल्याचे कळताच नागरिकांनी हारचे छायाचित्र घेण्यास गर्दी केली होती. हार तयार झाल्यानंतर प्रत्येकास आकर्षण ठरत होते. अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. सर्वांनाच ते शक्य होत नाही. तर काही असेही नशीबवान आहेत की त्यांना रामलल्लाची सेवा करण्याचे सौभाग्य लाभले आहे. त्यातील एक तिवंधा येथील एकनाथ सातपूरकर आहेत. मंदिराचे तसेच त्या ठिकाणी सुरू असलेले काम, पूजा विधी यांचे चित्रीकरण करण्याचे काम श्री. सातपूरकर यांना मिळाले आहे. वर्षभरापासून अयोध्येतील राम मंदिरात स्थायिक आहे. कामानिमित्ताने मुंबई येथे आले होते.
बुधवारी पुन्हा अयोध्येच्या प्रवासास निघणार होते. त्यांच्या माध्यमातून आपल्या शेतीत फुललेल्या गुलाबाचा हार रामलल्लाच्या गळ्यात अर्पण व्हावा, अशी इच्छा श्री. सातपूरकर यांचे आप्तसंबंधी मंगेश मुसमाडे आणि त्यांचे सहकाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आणि त्यांनी निश्चय केला. त्यातून हाराचा प्रवास सुरू झाला. मंगेश मुसमाडे, शलाका पत्की, प्रसाद पत्की, हिमांशू ठुसे अशा चौघांची गुलाबांची शेती आहे. अत्याधुनिक पॉलिहाऊस गुलाब शेती त्यांच्याकडून केली जाते. त्यांनी फुललेले गुलाब दहिपूल येथील भूषण कमोद फूल विक्रेत्यास उपलब्ध करून दिले. श्री. कमोद यांनी त्या विविध रंगी गुलाबाच्या फुलांपासून तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर पाच फुटी हार साकारला.