पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मद्यपी पित्याने कोयत्याने वार करून स्वत:च्या अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक गुन्हा बुधवारी (ता. ३) सकाळी वाघोली परिसरात घडला. या प्रकरणी फकिरा गुंडा दुपारगुडे (वय ४५, रा. वाघोली, मूळ रा. धाराशिव) याला अटक करण्यात आली. मृत मुलीचे नाव अक्षदा फकिरा दुपारगुडे (वय १५) असे आहे.
मुलीच्या नातेवाइकाने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने आरोपीला हडपसरमधून अटक केली. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फकिरा बांधकाम मजूर आहे. अक्षदा दहावीत शिकत होती. तिची आई आणि भाऊ मोलमजुरी करतात. ते प्राथमिक आरोग्य केंद्रामागील वसाहतीत राहतात.
बुधवारी सकाळी मद्य पिण्यावरून मुलीशी फकिराचा वाद झाला. त्यावेळी त्याने मुलीवर वार करून तो पळून गेला. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, सीमा ढाकणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी मुलीला ससून रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
आरोपीच्या शोधासाठी लोणीकंद पोलिस आणि युनिट सहाचे पथक पाठविण्यात आले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार युनिट सहाचे पोलिस निरीक्षक उल्हास कदम यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.