पुणेकराने काढला अयोध्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त; का निवडली २२ जानेवारी ही तारीख ?

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देशातील ज्या मोजक्या ज्योतिषांनी मुहूर्त काढले, त्यात येथील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग आहे. त्यांनी काढलेल्या २२ जानेवारी २०२४ च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

याबाबत देशपांडे म्हणाले, ‘‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज हे एका कार्यक्रमानिमित्ताने गेल्या वर्षी २० एप्रिलला आळंदीत आले होते. तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतले आणि श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी योग्य मुहूर्त काढावा, असे सांगितले.

मुहूर्त हा २५ जानेवारी आधीचा असावा, असेही त्यांनी सांगतिले. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी २९ एप्रिलला ज्योतिष, मुहूर्त शास्त्र आणि धर्मशास्त्राच्या आधारे २२ जानेवारी हा दिवस आणि अयोध्येच्या अक्षांश-रेखांशानुसार मेष लग्नावरील विशिष्ट स्थिर नवमांश बघून मुहूर्त काढून तो त्यांना औपचारिकरीत्या पत्राद्वारे कळविला. या दिवशी श्रीराम मूर्तीची होणारी प्राणप्रतिष्ठा माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.’’

१५ जानेवारी २०२४ ला सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. याच दिवशी उत्तरायणाला सुरुवात होत असून, यात सात्त्विक प्रकृती असलेल्या देवतांची स्थापना केली पाहिजे, असे सांगण्यात आले आहे. मात्र २५ जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने या काळात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करायची का? हा प्रश्न होता. त्यानुसार अभ्यास केला असता बृहदैवज्ञ रंजन, विद्या माधवीय आणि मुहूर्त गणपती या ग्रंथांमध्ये पौष महिन्यात प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते, असा उल्लेख आहे.

या महिन्यात प्राणप्रतिष्ठा केल्यास राज्यात वृद्धी होते, असेही यात सांगण्यात आले आहे. याबरोबरच विद्या माधवीय व गणपती दैवज्ञ यांच्या ग्रंथानुसार पौष व माघ महिन्यांत कोणत्याही देव-देवतांची प्राणप्रतिष्ठा करता येते, असाही उल्लेख सापडला. २२ जानेवारी २०२४ पौष शुद्ध द्वादशी रोजी संपूर्ण दिवस मृग नक्षत्र असताना अयोध्येच्या अक्षांश-रेखांशानुसार मेष लग्नावरील विशिष्ट स्थिर नवमांश बघून हा मुहूर्त श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठेसाठी काढण्यात आला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Protected Content