जळगाव प्रतिनिधी । राज्य निवडणूक आयोगामार्फत २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान ‘लोकशाही पंधरवडा’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज दिली.
या पत्रकार परिषदेला महापौर सीमा भोळे आणि आयुक्त डांगे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आयुक्त चंद्रकांत डांगे म्हणाले की, जागरूक मतदार, लोकशाहीचा आधार! हा यंदाचा विषय असून याकरिता शहरातील शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय संस्थांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. यासाठी शहरातील महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षणाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकार्यांची ९ जानेवारीला बैठक घेण्यात येणार आहे. त्यात १८ व १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची निश्चिती करुन त्यांचे नाव मतदार यादीत अंतर्भूत करण्यासंदर्भात सांगितले जाणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून शाळेच्या कंपाऊंड वॉलसह मुख्य मार्गिका या ठिकाणी मतदान जागृतीबाबत आकर्षक सचित्र संदेश रंगवण्यात येणार आहेत. लोकशाही निवडणूक व सुशासन याविषयावर निबंध स्पर्धा व वकृत्त्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदार जागृती अभियानाच्या व्यापक प्रसिद्धीसाठी शहरातील बिल्डर, आर्किटेक्ट, विकासक यांचा समावेश राहणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.