नवी दिल्ली-वृत्तसेवा । मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाना विधानसभा निवडणुकीच्या निकालाने आगामी लोकसभेचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट केले. देशाचा मूड काय आहे हे वेगळं सांगायला नको. अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी मतमोजणी सुरु आहे. हे काम अजून काही तास सुरु असेल. पण एकंदरीत सत्तेचे पारडे भाजपच्या बाजूने झुकल्याचे उघड झाले आहे. 3-1 असा निकाल लावण्यात भाजपला यश आले आहे. भाजपने काँग्रेसच्या हातून दोन राज्ये हिसकावली आहेत. मध्यप्रदेशमध्ये खूर्ची शाबूत ठेवली आहे. तर भाजपला राजस्थान आणि छत्तीसगडचे बोनस मिळाले आहे. तेलंगाणामध्ये बीआरएसला सत्तेतून खेचण्यात काँग्रेसला यश आले आहे. पण त्यांनी दोन राज्य गमावली आहेत. या विजयामुळे देशाच्या नकाशावर भगवे वादळ आले आहे. तर काँग्रेसची हुकमी राज्य हातून गेली आहे.
कोणत्या राज्यात कोणाचे सरकार
देशातील 28 राज्ये आणि विधानसभा असणारी दोन केंद्रशासित प्रदेश मिळून भाजप 16 राज्यात सत्तास्थानी आहे. काही ठिकाणी भाजपने युती केली आहे. या ठिकाणी एनडीएची सत्ता आहे. आता 12 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री असतील. या विधानसभा निवडणुकांपूर्वी 7 राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार होते वा आघाडीचे सरकार होते. आता ही संख्या 6 वर आली आहे. तर 8 अशी राज्य आहेत. जिथे ना काँग्रेस होती ना भाजप. अर्थात काही राज्यं I.N.D.I.A. आघाडीची आहेत. त्यात काँग्रेस हा मुख्य पक्ष आहे.
या राज्यात भाजप सत्तेत
भाजपने मध्यप्रदेशातील सत्ता कायम ठेवली. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्तेतून बाहेर खेचले. आता देशातील 11 राज्यांमध्ये भाजपची बहुमत असलेले सरकार असेल. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, गोवा, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यात भाजप सत्तेत आहे.
या राज्यात भाजपची युती
देशातील महाराष्ट्र, हरियाणा, मेघालय, सिक्कीम आणि नागालँड या पाच राज्यांमध्ये भाजप सहकारी पक्षांसह सत्तेत आहे. याठिकाणी NDA चे सरकार आहे. महाराष्ट्रात सत्तांतर करण्यात भाजपला मोठे यश आले आहे. पूर्वी महाराष्ट्र महाविकास आघाडीकडे होते. त्यात काँग्रेसचा समावेश होता. ज्या ठिकाणी युती आहे, अशा चार राज्यांमध्ये भाजप पक्षाचा मुख्यमंत्री नाही. यामध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मेघालयमध्ये एनपीपीचे कोरनाड संगमा, सिक्कीम राज्यात सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे प्रेम सिंह तमांग आणि नागालँडमध्ये नॅशनलिस्ट डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेफ्यू रिओ हे मुख्यमंत्री आहेत.