रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कामायनी एक्सप्रेसमधून पडल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आज दुपारी मुंबईकडे जाणार्या वाराणसी-मुंबई लोकमान्य टिळक टर्मीनस कामायनी एक्सप्रेसमधून दोन तरूण खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोन्ही तरूण एक्सप्रेसमधील बोगीच्या दरवाज्याच्या जवळ बसलेले होते. त्यांचा तोल गेल्याने खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हा अपघात रावेर रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या बोगद्याजवळ झाला.
दरम्यान, हे दोन्ही जण खाली पडल्याची माहिती मिळताच परिसरतील नागरिकांसह पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मयत तरूणांची नावे अनुक्रमे मोनू मंडल आणि आकाश वैद्य असून ते खंडवा येथून कामयानी एक्सप्रेसने भुसावळला जात असतांना त्यांच्यावर काळाने झडप घातली. हे तरूण संगीत पथकात वादक म्हणून काम करत होते. भुसावळला कार्यक्रमासाठी जात असतांना दुर्घटनेत या तरूणांना प्राण गमवावे लागले आहेत.
या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तर, या दोन्ही तरूणांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.