एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील कासोदा नाकाजवळ अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे आयशर गाडी एरंडोल पोलिसांनी पकडले असून १० गाई व १० वासरू यांची सुटका केली आहे. तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, एरंडोल शहरातील कासोदा नाका येथून आयशर गाडी क्रमांक (एमएच 18 बीजी ७०४०) मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या निर्दयपणे कोंबून १० गाई व १० वासरू यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलिसांनी शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता कारवाई करत वाहन ताब्यात घेतले आहे. कारवाईनंतर जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी श्रीपाद शंभू प्रसाद पांडे (वय-४२) रा. धरणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र राजेंद्र माळी (वय 36), आबा बजरंग पाटील (वय 45) आणि इमरान गंजा कुरेशी (वय 24) सर्व रा. देवपूर धुळे या तिघां विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल पाटील करीत आहे.