जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाय योजना राबविण्याचे आवाहन केले आहे. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा. जळगाव शहर व जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महापालिका आयुक्त व जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदुषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे.
बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत त्याचबरोबर साचलेली धुळे साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बांधकाम ठिकाणांवर धुळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाण धुळमुक्त करण्यात यावेत. कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदुषण होणारी ठिकाणांवर संनियंत्रण करण्यात यावे. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी दिल्या आहेत.
मोकळया जागेमध्ये पालापाचोळा किंवा घरगुती घनकचरा जाळण्यास निर्बंध असतील. महानगरपालिका / नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रस्त्यांना पक्के फूटपाथ करावेत. बेकरीमध्ये वापरात जीवाश्म प्रदूषणकारी इंधनाच्या ऐवजी स्वच्छ पर्यायी इंधन, जसे की इलेक्ट्रिक ओव्हन, पीएनजी किंवा इतर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी दिशानिर्देश जारी करावे, विद्युत किंवा इतर पर्यावरणास अनुकूल इंधनाचा वापर करुन, स्मशानभूमीच्या अंत्यसंस्काराच्या सुविधा रुपांतरीत करण्यासाठी संबंधित आस्थापनाने सक्रिय पावले उचलावीत. प्रदुषण मंडळाने स्थापित केलेल्या सतत हवा गुणवत्ता देखरेख केंद्रांची नियमितपणे महापालिका प्राधिकरणाद्वारे तपासणी/निरीक्षण करावेत. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे प्रदुषण नियंत्रणाच्या मोहीमेत सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रदुषण नियंत्रण मंडळाने केले आहे.