जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील माहीजी रेल्वे स्टेशन दरम्यान एका धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी ३५वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, पाचोरा तालुक्यातील माहिजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे स्टेशन प्रबंधक पालरेचा यांनी दिल्यानंतर घटनास्थळी रेल्वे पोलीस सचिन भावसार यांनी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला आहे. तरुणाच्या अंगात काळा पांढऱ्या रंगाचा फुल बाहीचा शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली आहे. तसेच उजव्या हातावर हनुमान तर डाव्या हातावर भारती असे नाव गोंदलेले आहे. तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव रेल्वे स्टेशनचे रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन भावसार यांनी केले आहे. याबाबत जळगाव रेल्वे स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस सचिन भावसार करीत आहे.