अमळनेर प्रतिनिधी । आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांनी इंदासी धरण ते अंबापिंप्री या ५ किलोमीटर जलवाहिनीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले असून याचे जलपूजन करण्यात आले.
आमदार शिरीष चौधरी यांच्याच हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम अंबापिंप्री येथे मोठ्या थाटात पार पडला,सदर योजनेमुळे या गावाची पाणी समस्या कायमची सुटल्याने सुखावलेल्या ग्रामस्थासह कार्यक्रमाचे आयोजक सरपंच गुलाबराव महाजन यांनी आमदार चौधरी यांचे गावात आगमन होताच मिरवणूक काढली.आमदारांनी आपल्या मनोगतात आमदार निधी मधून १० लाखांची विहीर गावासाठी मंजूर असून लवकरच तीचे काम सुरू होऊन पूर्णत्वास येणार आहे,यामुळे भविष्यात या गावात कधीही पाणीप्रश्न उद्भवणार नाही अशी ग्वाही दिली. तर अनेक गावांत टंचाई असताना आमदार चौधरी यांच्या प्रयत्नातून इंदासी धरणातून जलवाहिनी टाकल्याने या गावाला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने ग्रामस्थानी आनंद व्यक्त करत आमदारांचे आभार मानले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पारोळा नगरपरिषदेचे गटनेते बापू तुकाराम महाजन, प्रा बी. एन. पाटील, अनिल महाजन, राजेंद्र पाटील, सरपंच गुलाबराव महाजन यांनी मनोगत व्यक्त करून आ चौधरींचे विकास कामांचे कौतुक केले. याप्रसंगी ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायत पदाधिकारी व शिरीषदादा मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.