जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार राजूमामा भोळे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे जळगाव महापालिकेतील अनियमीत या प्रकारातील अस्थायी कर्मचारी पर्मनंट झाले असून अनुकंपा तत्वावरील कर्मचार्यांच्या भरतीचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. या कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देखील मिळणार असल्याने त्यांचा यंदाचा दसरा आणि दिवाळी ही खर्या अर्थाने गोड होणार आहे.
जळगाव नगरपालिकेच्या १९९१-९२ ते १९९७-९८ या कालावधीत झालेल्या अनियमित भरती संदर्भात विशेष लेखापरीक्षण लावण्यात आलेले होते.त्यात जवळपास ११५० ते १२०० कर्मचार्यांच्या अनियमित नेमणुका, पदोन्नत्या, शैक्षणिक अर्हता व वयाधीक्याबाबत आक्षेप घेण्यात आलेला होता. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित होते, तसेच जे कर्मचारी सेवा निवृत्त झाले होते त्यांना मागील ४ वर्षांपासून रजा वेतन व उपदानाच्या रक्कमा मिळत नव्हत्या, त्यामुळे सदर कर्मचारी खूपच त्रस्त होते. त्यानंतर सर्व कर्मचारी यांनी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भाळे यांची भेट घेऊन त्यांना साकडे टाकले.
दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मदतीने या कामासाठी पाठपुरावा सुरू केला. याचेच फलीत म्हणून आज महापालिकेतील अस्थायी कर्मचारी आता स्थायी अर्थात पर्मनंट झाले आहेत. याचा सुमारे बाराशे कर्मचार्यांना लाभ होणार असून त्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देखील मिळणार आहे. तर, यासोबत गेल्या सुमारे दहा वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील भरतीचा मार्ग देखील आता मोकळा झाला आहे. यामुळे मयत कर्मचार्यांच्या वारसांना सेवेत रूजू होता येणार आहे. या माध्यमातून आमदार राजूमामा भोळे यांनी महापालिका कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला आहे.