मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंत्रिमंडळ विस्तारावर काल रात्री चर्चा झाली. त्यानुसार रविवार, १६ जून रोजी, म्हणजेच उद्या हा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. परंतू अंतर्गत वाद टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाकारले असल्याचे वृत्त आहे.
मागील विधानसभा निवडणुकीआधी तुटलेली सेना-भाजपची युती २०१९च्या लोकसभा निवडणुकीआधी पुन्हा झाली. त्यानुसार लगेचच महामंडळावरील नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. या चर्चेअंती नव्या विस्तारावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस यांनी त्याबाबत ट्विटही केले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एका राज्यमंत्री पद मिळणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादे मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत यांची नावं आघाडीवर आहेत. तर दादाजी भुसे आणि संजय राठोड यांचीही नावं चर्चेत आहेत.
दरम्यान, शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या नावाची चर्चा आहे. पण यावरुन नाराज असलेल्या आमदारांच्या एका गटाने एकनाथ शिंदेंसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरु केली आहे. तसेच ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याची देखील चर्चा आहे.